कैलास खोट्टे
जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर, दि. 06 ऑगस्ट 2025: संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘फळबाग लागवड योजना’च्या अंमलबजावणीत होत असलेल्या विलंबाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वराज्य पक्षाचे तालुका अध्यक्ष श्री. पवन शेंडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन सादर करून योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने लाभ मिळवून देण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, ही योजना संग्रामपूर तालुक्यात केवळ कागदोपत्रीच मर्यादित आहे. विशेषतः केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या फायली कृषी विभागात धूळ खात पडून असून, त्यांना योजनेचा लाभ मिळण्यासाठी कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष आहे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य मिळणे अपेक्षित होते, परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे शेतकरी उपेक्षित राहिले आहेत.शेतकऱ्यांनी मागणी केली आहे की, प्रलंबित फायलींची तातडीने तपासणी करून मंजुरी द्यावी, केळी उत्पादकांना लाभ त्वरित मिळवून द्यावा आणि योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता ठेवावी. तसेच, शेतकऱ्यांना नियमित माहिती पुरवावी. स्वराज्य पक्षाने चेतावणी दिली आहे की, जर याबाबत त्वरित कार्यवाही झाली नाही, तर तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे.यावेळी स्वराज्य पक्षाचे तालुका युवा अध्यक्ष पवन शेंडे,धनंजय कोरडे तालुका अध्यक्ष स्वराज्य पक्ष संग्रामपूर. आकाश कळमकर .गौरव कळमकर.फारुक शहा.प्रतीक गावंडे .गौरव काळे उपस्थित होते
