कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
संग्रामपूर – तालुक्यातील नेकनामपूर येथीलबळीराजा शिक्षण व बहुद्देशीय संस्था द्वारा संचालित बालशिवाजी इंग्लिश स्कूल, वानखेड फाटा येथे गुरुवार १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा प्रविण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व पूजन करून करण्यात आली. “जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. यानंतर राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज तसेच बालशिवाजी शाळेचे संस्थापक लोकनेते स्व.जनार्दन चोपडे यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला.यावेळी शाळेचे सर्वेसर्वा व नामवंत सर्जन डॉ.प्रविण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे ध्येय, शिस्त आणि परिश्रमाचे प्रतीक आहे. विद्यार्थ्यांनी महाराजांच्या प्रेरणेतून जीवनात मोठे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहिले पाहिजे.”शिक्षणासोबत संस्कार आणि आत्मविश्वास निर्माण झाला, तरच विद्यार्थी उज्ज्वल भविष्य घडवू शकतात, असेही त्यांनी नमूद केले. यानंतर संस्थेच्या अध्यक्षा डॉ.अपर्णा प्रविण पाटील यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. शिक्षणाबरोबरच संस्कार, शिस्त आणि राष्ट्रभक्तीची भावना जोपासणे आवश्यक असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी नृत्य, समूहगीत, देशभक्तीपर नाट्यप्रयोग तसेच शिवरायांच्या वेशभूषेत सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या कला सादरीकरणाला भरभरून प्रतिसाद दिला.यावेळी व्यासपीठावर संग्रामपूर तहसीलदार प्रशांत पाटील, नायब तहसीलदार विकास शिंदे, तामगांव ठाणेदार पंडितराव सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्या श्रीमती सुलोचनाताई चोपडे, काथरगावच्या सरपंच सौ.सुवर्णाताई टापरे, वरिष्ठ नागरिक त्र्यंबकराव चोपडे, नेकनामपूरचे पोलीस पाटील प्रशांत चोपडे, पातुर्डा ग्रामसेवा सहकारी संस्थेचे संचालक बब्लू पाटील चोपडे, प्रदीपभाऊ राऊत, डॉ.समीर शेख, गणेश टापरे, गजानन गव्हांदे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका पुनम बोरोकार यांनी केले, तर शिक्षिका माधुरी गायकवाड यांनी आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रशांत गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्याध्यापक संदीप साळुंके, शिक्षिका माधुरी गायकवाड, प्रीती दामधर, पुनम बोरोकार, रुतुजा गायकी, प्रिया सुलताने, निकीता वेलकर, जयश्री धुमोने, वैष्णवी जाधव, रूतुजा बकाल, आरती बकाल, आश्विनी भोपळे, शिक्षक प्रथमेश ठाकरे, नागसेन इंगळे, भूषण वानखडे, वैभव गाडगे, तसेच शिक्षकेतर कर्मचारी संदीप गायकी, विलास खंडेराव, संतोष गायकी, निर्मला लाहुकार, किरण बागडे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.







