जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथून जवळच असलेल्या आदिवासी बहुल भागातील पिंगळी जहागीर येथे एक वीज खांब गंभीरपणे झुकलेल्या अवस्थेत असून तो कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.या संदर्भात पिंगळी जहागीर येथील रहिवासी संतोष पद्मसिंग धांडेकर यांनी 18 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्य विद्युत केंद्र, सोनाळा येथे लेखी तक्रार अर्ज दिला होता. मात्र तक्रारीनंतरही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.सदर वीज खांबाजवळ घरे असून परिसरात नागरिकांची सतत वर्दळ असते. तसेच लहान मुले खेळत असल्याने आणि महिलांची ये-जा सुरू असल्याने संभाव्य अपघाताचा धोका वाढला आहे. खांब कोसळल्यास जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सांगितले.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, खांबाजवळील झाडे तोडण्यात आल्यानंतर आधार कमी झाल्याने खांब अधिक झुकला आहे. गेल्या 15 दिवसांपासून संबंधित अधिकाऱ्यांना माहिती देऊनही दुरुस्ती किंवा सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही.
स्थानिक नागरिकांनी महावितरण प्रशासनाने तातडीने दखल घेऊन धोकादायक वीज खांबाची दुरुस्ती करावी किंवा नवीन खांब उभारावा, अशी मागणी केली आहे. तसेच कोणतीही दुर्घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागावर राहील, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे.






