कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
सोनाळा येथील बस स्टँड परिसरात प्रवाशांसाठी स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी आज “खाते पिते आंदोलन” केले. बस स्थानकावर दररोज मोठ्या प्रमाणात प्रवासी ये-जा करतात. मात्र येथे स्वच्छ व पुरेशी स्वच्छतागृह सुविधा नसल्याने महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.आंदोलनादरम्यान नागरिकांनी बस स्टँड परिसरात बसून प्रतीकात्मक पद्धतीने खाते-पिते आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले. “प्रवाशांच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष का?” असा सवाल उपस्थित करत तातडीने स्वच्छतागृह उभारण्याची मागणी करण्यात आली.यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की, अनेक वेळा संबंधित विभागाकडे निवेदने देऊनही प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. प्रशासनाने लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही न केल्यास पुढील काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.या आंदोलनात स्थानिक नागरिक, विट्ठल महाले सामाजिक कार्यकर्ते आणि प्रवाशांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.






