भारतीय समाजसुधारणेच्या इतिहासात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर हे एक तेजस्वी आणि क्रांतिकारी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जातात. १२व्या शतकात त्यांनी समाजातील अन्याय, विषमता आणि अंधश्रद्धेच्या विरोधात उभे राहत एक नवीन सामाजिक दिशा दिली. त्या काळात समाजात जातिभेद, उच्च-नीचता, स्त्रीदमन आणि कर्मकांड यांचा मोठ्या प्रमाणात प्रभाव होता. अशा परिस्थितीत बसवेश्वरांनी “समता, बंधुत्व आणि मानवता” यांचा संदेश देत समाजाला नवसंजीवनी दिली.बसवेश्वरांचा जन्म कर्नाटकातील बागेवाडी येथे झाला. बालपणापासूनच त्यांच्यात जिज्ञासा आणि ज्ञानलालसा दिसून येत होती. त्यांनी विविध धर्म, तत्त्वज्ञान आणि सामाजिक व्यवस्थांचा सखोल अभ्यास करून एक स्वतंत्र आणि विवेकनिष्ठ विचारसरणी विकसित केली. त्यांनी केवळ सैद्धांतिक विचार मांडले नाहीत, तर ते स्वतःच्या जीवनात आचरणात आणले.त्यांच्या “कायकवे कैलास” या तत्त्वज्ञानाने समाजात मोठा बदल घडवून आणला. त्यांनी श्रमाला सर्वोच्च स्थान दिले आणि सांगितले की, प्रामाणिकपणे केलेले काम हेच खरे ईश्वरपूजन आहे. श्रम करणारा प्रत्येक माणूस सन्मानास पात्र आहे, हा विचार त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता. त्यांनी लोकांना भिक्षा मागण्याऐवजी स्वकष्टावर जगण्याचा संदेश दिला.बसवेश्वरांनी अनुभवमंटप’ या संस्थेची स्थापना करून एक प्रकारची लोकशाही परंपरा सुरू केली. येथे सर्व जाती-धर्मातील स्त्री-पुरुष समानतेने सहभागी होत आणि आपले विचार मांडत. हे व्यासपीठ विचारस्वातंत्र्य, चर्चा आणि बौद्धिक देवाणघेवाण यासाठी खुले होते. त्यामुळे समाजात बौद्धिक आणि सामाजिक क्रांती घडून आली. त्यांच्या वचनसाहित्यातून त्यांनी समाजाला नैतिकता, प्रामाणिकपणा आणि विवेकशीलतेचा संदेश दिला. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, पुरोहितशाही आणि बळीप्रथेला विरोध केला. “देहच देवालय आहे” या विचारातून त्यांनी बाह्य आडंबराला नाकारून अंतःकरणाच्या शुद्धतेवर भर दिला.बसवेश्वरांनी स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करत स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान दिले. त्या काळात स्त्रियांना शिक्षण आणि विचार मांडण्याचे स्वातंत्र्य नव्हते, परंतु बसवेश्वरांनी त्यांना समान अधिकार दिले. त्यामुळे समाजात मोठा सकारात्मक बदल घडून आला.आजच्या आधुनिक युगातही बसवेश्वरांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत. सामाजिक समता, न्याय, नैतिकता आणि विवेक यांचा पुरस्कार करणारे त्यांचे तत्त्वज्ञान आजही तितकेच सुसंगत आहे. आधुनिक समाजाने त्यांच्या विचारांचा स्वीकार केल्यास सामाजिक विषमता कमी होऊन एक सुसंस्कृत आणि प्रगत समाज निर्माण होऊ शकतो.
. वैभवआप्पा अशोकआप्पा घोडेस्वार(रा. सोनाळा ता. संग्रामपूर जि. बुलडाणा महाराष्ट्र) प्राध्यापक माऊली अभियांत्रिकी महाविद्यालय शेगांव).







