कैलास खोट्टे जिल्हा प्रतिनिधी बुलढाणा
आजच्या आधुनिक काळात लग्न समारंभात पाहुण्यांना विविध भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. मात्र, सोनाळा येथील भास्कर शेटे यांनी आपल्या मुलाच्या लग्नात एक आगळावेगळा आणि समाजाला दिशा देणारा उपक्रम राबवला. त्यांनी लग्नसमारंभात उपस्थित सर्व पाहुण्यांना ‘भगवद्गीता’ हे पवित्र ग्रंथ भेट म्हणून देऊन अनोखी परंपरा निर्माण केली.या उपक्रमामागे धार्मिक आणि नैतिक मूल्यांची जपणूक व्हावी, तसेच तरुण पिढीने अध्यात्माकडे वळावे, हा उद्देश असल्याचे भास्कर शेटे यांनी सांगितले. लग्नास उपस्थित पाहुण्यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, ही भेट अत्यंत अर्थपूर्ण असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.आजच्या काळात दिखाऊपणाला अधिक महत्त्व दिले जात असताना, अशा प्रकारचा साधा पण विचार प्रवर्तक उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. भास्कर शेटे यांच्या या कृतीमुळे सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश मिळत असून, हा उपक्रम इतरांनीही अनुकरणीय ठरावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







